Sunday 29 September 2019


सावध ऐका पुढच्या हाका....



एकांगी शहरकेंद्रीत भौतिक विकास आपल्याला कुठे घेऊन जातोय हे एकदा शांतपणे बसून विचार करून बघितलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का?
अज्ञानात सुख असतं”, ही म्हण किती खरी आहे, हे विचार करायला लागल्यावर आपल्याला पदोपदी जाणवत राहतं. कित्येक महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला जाणीवच नसते, इतके आपण आपल्या विश्वात गुंगून गेलो असतो. आणि मग अचानक एक दिवस मोठं फटका मिळाला की परत निसर्ग, पर्यावरण, नैसर्गिक स्त्रोत यांच्या नावाने खडे फोडत राहतो. आपली काही चूक असू शकते याची जाणीव असल्याचं बहुसंख्य लोकांच्या प्रतिक्रियांवरून वाटत नाही.
आज गोष्ट सांगतोय ओरिसामधील सातभायाची, एका सात गावांच्या समूहाची, आणि एकूणच समुद्रकिनाऱ्यावर होत असलेल्या समुद्राच्या आक्रमणाची.
पुरी जिल्ह्यातील उदयकानी नावाचं गाव लांबून पाहिलं तर काही वेगळेपणा जाणवत नाही. भरपूर वृक्ष, टुमदार घरं आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा यामुळे गाव छान दिसतं, पण गावातल्या लोकांशी बोललं की कळतं, समुद्राने जमीन गिळंकृत केल्यामुळे गाव तीनवेळा आतमध्ये विस्थापित होतंय.
एकूणच, ओरिसामधील समुद्रकिनाऱ्याच्या ३०% पेक्षा जास्त किनाऱ्यावर समद्राच्या आक्रमणाचा दबाव आहे. समुद्राच्या पाणी पातळीमधे होत असलेली वाढ यासाठी कारणीभूत आहे. २०१४ मधे केलेल्या संशोधनातून अशी माहिती मिळते की ओरिसामधील १०% समुद्रकिनाऱ्याची जमीन या आक्रमणांमुळे धोक्यात आली आहे.
पारादीप बंदर आणि इतर अनेक बांधकाम प्रकल्पांमुळे त्या परिसरातील सातभाया आणि इतर काही गावं समुद्राच्या आक्रमणांमुळे पाण्याखाली चालली आहेत. एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, १९९९-२०१६ या काळात ओरिसाच्या ४८५ किमी समुद्रकिनाऱ्यापैकी अंदाजे १५४ किमी म्हणजे साधारण २८% किनारा समुद्राच्या सततच्या आक्रमणांमुळे गमावला आहे. यात, समुद्राची उंची वाढण्याबरोबरच सतत येत असलेली वादळं, बदलणारी वाऱ्यांची दिशा ही कारणंही महत्त्वाची आहेत.
केंद्र शासन या प्रश्नावर उपाय करण्यासाठी प्रयत्न करत आहे. २०१६ मधे संसदेत माहिती देताना सरकारने सांगितलंय की, या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक हवामान बदलांमुळे भारतातील समुद्राची उंची ३.५ इंच पासून सुमारे ३४ इंचांपर्यंत वाढेल (जवळपास ३ फूट) असं अनुमान आहे.
हे समुद्राचं पाणी आत येतं तेव्हा फक्त जमीन गिळंकृत करतं असं नाही, तर भूजलसाठा क्षारयुक्त होतो, शेतजमीन खराब होते, त्यामुळे शेती करणं अशक्य होतं, झाडं वाढत नाहीत, आहेत ती मरतात. पिण्यायोग्य पुरेसं पाणी नसल्याने, क्षारयुक्त पाणी वापरल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. स्थलांतर करण्याची वेळ येते. अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात.
ज्या सातभाया गावाबद्दल आपण बोलतोय, त्याची परिस्थिती फारच वाईट आहे. सातपैकी सहा गावं समुद्राने गिळंकृत केली आहेत. परिस्थिती इतकी वाईट आहे की सरकारने पुनर्वसन करताना १२ किमी लांब जागा निवडली आहे. या भागात होणारं समुद्राचं आक्रमण थोपवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण भिंत बांधण्याचा प्रयोगही झाला आहे. हा प्रयोग पेंथा नावाच्या गावात झाला. १ किमी लांबीची भिंत यात बांधली गेली. २०१६ मधे हे काम पूर्ण झाल्यानंतर आक्रमण एकदम कमी झालं असं लोकांचं निरीक्षण आहे. पण या १ किमी लांब भिंतीला अंदाजे ४५ कोटी रूपयांच्या आसपास खर्च आला. आणि अशी भिंत केवळ वस्ती वाचवू शकते, पर्यावरणाच्या इतर घटकांना उपयोग होत नाही, तिथली जीवसृष्टी वाचवणं शक्य होत नाही. त्यामुळे आणि एकूण खर्चाचा विचार केला तर हे व्यावहारिक दृष्ट्या यशस्वी होणं जवळपास अशक्य आहे.
यावर उपाय काय?
लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणं, मॅनग्रुव्हज् जपणं, वाढवणं, त्याचा उपयोग करून नवीन रोजगार संधी उपलब्ध करणं, इत्यादी अनेक उपाय चालू आहेत आणि त्याचा सकारात्मक परिणामही दिसतोय. सातभाया गावातील फोटो पाहिले तर आपण थक्क होतो. एकेकाळी (काहीच वर्षांपूर्वी) गावाच्या मधोमध असलेल्या बोअरवेल्स आत्ता आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर रेतीमधे उभ्या असलेल्या दिसतात. गावं उठून गेली आहेत, शेतजमीन गायब झाली आहे, दिसतेय ती फक्त वाळू!
या सर्व गोष्टी मुंबई आणि कोकण भागातील लोकांनीही लक्षात घेणं आवश्यक आहे. समुद्राचं आक्रमण या किनाऱ्यावरही हळूहळू होताना दिसतंय. त्यातच आपण किनारपट्टीकडे पर्यावरण संतुलनाच्या गोष्टीने हवं तेवढं लक्ष देत नाही आहोत. समुद्रकिनाऱ्यांचं रक्षण करायला उपयोगी पडणारी मॅन्ग्रोव्ह जंगलं धोक्यात आली आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या दडपणामुळे आपण या महत्त्वाच्या आणि उपयुक्त गोष्टी हळूहळू गमावत चाललो आहोत.
जर समुद्रकिनारा सुरक्षित राखायचा असेल आणि समुद्राच्या वाढणाऱ्या उंचीला लांबवायचं असेल तर पर्यावरण संतुलन अनिवार्य आहे. जमीन राहिली तर त्यावर विकास करता येईल, अन्यथा, तेल, तूप गेलं, हाती धुपाटणं राहिलं ही वेळ येणार आहे.
डॉ. उमेश मुंडल्ये
(छायाचित्रे - आंतरजालावरून)

Sunday 13 May 2018

सरकारी आणि खाजगी पातळीवरील पावसापूर्वीची संधारणाची कामं - मृगजळ आणि वास्तव

सरकारी आणि खाजगी पातळीवरील पावसापूर्वीची संधारणाची कामं - मृगजळ आणि वास्तव 
 

दरवर्षी पावसाळ्याच्या आधी ग्रामीण भागांत शेती, जंगल आणि तत्सम इतर परिसरांत मृद संधारण आणि जल संधारण यासाठी सरकारी पातळीवर आणि स्वयंसेवा संस्थांच्या पातळीवर अनेक कामं युद्ध पातळीवर घेतली जातात. 
पूर्वी, रोजगार हमी योजनांमधून ही कामं केली जात आणि त्यात माणसाच्या हाताला काम हे अपेक्षित असे, प्रत्यक्ष काम मर्यादित स्वरुपात होत होतं, त्यामुळे माती आणि दगड यांचं विस्थापन कमी होत असे आणि त्या विभागातील भौगोलिक परिस्थिती (topography) फारशी बदलण्याचा धोका नसे किंवा तो अगदी मर्यादित असे.
सध्या, यंत्र (JCB, Poclain) वापरण्याचा उत्साह भयंकर (शब्दशः) वाढला असून, वाढत्या यांत्रिक वापरामुळे त्या त्या भागातील माती आणि दगड यांचं विस्थापन हे प्रचंड प्रमाणात वाढतंय. यात अनेक प्रकारच्या संस्था आढळतात,
अ. वेगवेगळ्या सामाजिक काम करणाऱ्या, 
ब. करण्याची इच्छा असलेल्या पण काय करायचं त्यातील तांत्रिक ज्ञान नसलेल्या (आणि असं काही असतं याची जाणीव अजिबात नसणाऱ्या) आणि, 
क. तसं काम करतोय असा गैरसमज असणाऱ्या स्वयंसेवी संस्था, 
हे सर्वजण सध्या विविध उद्योगपती, दानशूर व्यक्ती, स्वघोषित तज्ञ, या लोकांच्या प्रेरणेने (म्हणजे काय कोण जाणे) आणि यंत्रांच्या मदतीने ग्रामीण भाग अक्षरशः नांगरून काढताना दिसत आहेत. मग तो सपाटीचा भाग असो, किंवा डोंगर उतार, पठार असो किंवा भातशेतीची खाचरं, गावालगतचा भाग असो किंवा दूर जंगलातील, कशाचा कशाला संबंध दिसत नाही. फक्त टार्गेट पूर्ण करणं किंवा एखादी स्पर्धा जिंकणं एवढाच हेतू दिसतो. आपल्याला या विषयातील काही ज्ञान आहे का, आपला याचा अभ्यास आहे का, काही अनुभव आहे का, आपण करतोय ते बरोबर आहे का, त्याची त्या भागात गरज आहे का, आपल्यामुळे काही नुकसान तर होणार नाही ना,  यातील किती प्रश्न या स्वयंप्रेरित लोकांना पडतात तेच जाणे.
मृद संधारण आणि जल संधारण या दोन्ही गोष्टी स्थालानुरूप असल्या तरच त्याचा अपेक्षित फायदा मिळतो आणि नुकसान होत नाही हे यापैकी खूप लोकांच्या मनातही येत नाही हा किमान माझा तरी अनुभव आहे. ही कामं करण्यासाठी अभ्यास लागतो, तो प्रत्येक ठिकाणी वेगळा करावा लागतो, एका ठिकाणची योजना दुसऱ्या ठिकाणी अभ्यास न करता कॉपी केली तर त्या गावाचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं, इत्यादि गोष्टींचा विचार करायची गरजही न यातल्या बहुसंख्य संस्थांना वाटते, ना गावातल्या लोकांना वाटते. आणि गंभीर बाब म्हणजे, यात काम करणारे आणि न करणारे बहुसंख्य तज्ज्ञही काही अनाकलनीय कारणांमुळे या विषयावर गप्प बसून चाललेलं नुकसान बघत बसलेले दिसतात. 
हे दृश्य राज्यभर दिसतं. अगदी कालच शहापूर भागात भातसा धरणाच्या परिसरात हे काल पाहिलं आणि लिहील्यावाचून राहवलं नाही म्हणून हा लेख.
त्या गावाला भयंकर पाणी टंचाई जाणवते, म्हणून एका रोटरी क्लब बरोबर काल सर्वेक्षणासाठी गेलो होतो. गाव एका पठारावर, एका कडेला वसलेलं. सगळ्या बाजूंनी उतार. त्यामुळे वर वर्षभर पुरेल इतकं पाणी कुठेच अडवता येणं  जवळ जवळ अशक्य. वरच्या पठारावर गावालगत लोकांची थोडी थोडी शेती (माती आणून टाकून तयार केलेली). गावाला पाणी पुरवणाऱ्या विहिरी खाली दरीत, चांगलं दीड किमी अंतरावर आणि ३०० फूट खाली उतरून गेल्यावर. त्या पायवाटेवरून जाताना दिसलेली ही सरकारी करामत! सोबत जोडलेल्या फोटोत सहज दिसेल.
जिथे दरवर्षी अडीच हजार ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो, तिथे या गावात लोकांच्या शेतांमध्ये बांधाच्या ठिकाणी शेतातील माती यंत्राने खरवडून काढून टाकली आहे. मुळात, इथे माती खूप कमी शिल्लक आहे. बेसुमार वृक्षतोड केल्यामुळे बरीच माती वाहून गेलीय. जी थोडी शिल्लक आहे, त्यात लोक शेती करतात. आता, त्यातील माती खरवडून काढून बांधावर लावली आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी मुरूम उघडा पडलाय. आता, पावसाळ्यात काय होणार तर जोराच्या पावसाने माती वाहून जाणार खाली ओढ्यात आणि शेवटी भातसा धरणात. आणि उघड्या झालेल्या मुरुमातून पाणी मुरून खाली निघून जाणार. म्हणजे या अप्रतिम योजनेतून आपण काय साध्य करणार? तर त्या शेतकऱ्याच्या शेतातील माती कायमस्वरूपी वाहून जाणार आणि शेतीचा कस आणखी कमी होणार, माती वाहून जाऊन खालच्या धरणात साठणार आणि लोकांची पाण्याची समस्या तर कायम राहणारच पण नवीन मातीची समस्या उद्भवणार.
आणि हे दृश्य त्या परीसारांतच नाही तर अगदी मराठवाड्यातही दिसतं. कारण, आपल्याकडे अशा योजनांमध्ये त्या भागातील हवामान, पाऊस, भौगोलिक परिस्थिती, चढ उतार, मातीची खोली, वगैरे गोष्टी विचारात न घेताच सगळीकडे एकाच प्रकारच्या उपायांनी ती समस्या सोडवायचा प्रयत्न होतो. 
जर आपल्याला काम करून अपाय न करता योग्य उपाय करायचा असेल तर असं वागून चालणार नाही. पाणी आणि मृद संधारण करताना वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचा विचार आणि अभ्यास करून स्थालानुरूप काम करावं लागेल, तरंच त्याचा दूरगामी फायदा दिसेल. 
अन्यथा, ही केवळ एक स्पर्धा समजून जास्त काम म्हणजे जास्त छान काम असं समजून काम केलं किंवा योग्य अभ्यासाशिवाय मनाला वाटेल ते काम केलं तर त्यातून तात्पुरतं खोटं समाधान मिळू शकेल, आपण चार दिवस फोटो सगळीकडे टाकून धम्माल करू शकू, पण त्यात त्या बिचाऱ्या गावकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार कोणी करायचा? ते कदाचित कायमस्वरूपी असू शकतं.
तेव्हा या कामांमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना हात जोडून विनंती, की कृपया अभ्यास करून, योग्य स्थालानुरूप योजना आखून मोजकं पण योग्य आणि शाश्वत काम करा. आपली अतिउत्साहामुळे एखाद्या गावाचं नुकसान तर होत नाहीये ना याची खात्री करून घ्या. आणि ही संधारणाची कामं स्थालानुरूप असतात आणि प्रत्येक ठिकाणी अभ्यास करून करायची असतात, हे लक्षात ठेवा.
डॉ. उमेश मुंडल्ये   

Tuesday 3 April 2018



विहीर आणि बोरवेल - काय, कुठे आणि का?

ही कथा आहे माझ्या एक मित्राची, वर्षांपूर्वीची. एक रोटरी कार्यक्रमात तो दुसऱ्या मित्राला सांगत होतात्याचं बदलापुरजवळ फ़ार्म होतं आणि तिथे पाण्याचा काही प्रश्न होता. एक बोरवेल आहे पण पाणी फक्त १०-१५ मिनिटं येतं आणि मग बंद पडतं. आता दुसरी बोरवेल करायची आहे, त्यासाठी माणूस येणार आहे. तेवढ्यात त्याने मला पाहिलं आणि तो मला म्हणाला की एकदा येऊन सांग ना काही करता येतंय का ते?
कामाच्या व्यापात ते राहून गेलं आणि एक दिवस त्याचा परत फोन आला की आज दुसरी बोरवेल करतोय कारण पहिली बोरवेल अजिबात पाणी देत नाहीये. मला वेळ होता म्हणून मी गेलो, तेव्हा बोरवेलचं काम चालू झालं होतं. त्यामुळे त्याबद्दल काही न बोलता मी त्याला सांगितलं की काही अडचण आली तर सांग, मी आत्ता तुझ्या जमिनीचा सर्वे केलाय आणि माझ्याकडे अजुन १-२ मार्ग आहेत पाणी मिळवण्यासाठी.
रात्री त्याचा फोन आला की थोडं थोडं करत ४३० फुटांपर्यन्त खाली गेल्यावरही पाणी बिलकुल मिळालं नाही. शेवटी बोरवेल करणारा वाद घालून निघून गेला. तेव्हा तू काहीही कर पण उद्या ये.
मी दुसऱ्या दिवशी गेलो. सगळे हताश होते की ४०० फुट खाली जाऊन पाणी नाही मिळालं, आता पुढे काय? लावलेली झाडं मरणार का? पाणीच नाही मिळालं तर पुढे काय करायचं?
मी केलेल्या त्या जमिनीच्या अभ्यासाप्रमाणे मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बोरवेल न करता विहीर करायला हवी होती. विहीरीला पाणी मिळेल इथे.
त्या सर्वांना हा मोठा धक्का होता. जिथे ४०० फुट खोल पाणी मिळालं नाही तिथे हा सांगतोय की विहीरीला पाणी मिळेल? त्यावर विचार करून आणि दुसरा मार्ग नसल्याने असेल कदाचित, त्यांनी माझ्या सल्ल्यावर विश्वास ठेवला आणि मी निश्चित करून दिलेल्या ठिकाणी विहीर खणायला सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशी दुपारी त्या मित्राचा फोन आला, उमेश, १७ फुटांवर एक झरा मिळालाय आणि २ तासांनी परत फोन आला की १९ फुटांवर अजुन एक झरा लागलाय.
सकाळी मी जागेवर गेलो तेव्हा तिथे अंदाजे ४ फूट पाणी जमा झालं होतं. सगळ्यांच्या दृष्टीने हा चमत्कार होता कारण ४०० फूट खोल पाणी नाही आणि २० फुटांच्या आत आहे हे दिसत असलं तरी पटत नव्हतं.
ही घटना २०१३ मधील आहे. तेव्हापासून त्या विहीरीला पाणी आहे. दोन वर्षांपूर्वी कमी पाऊस, जास्त तापमान या गोष्टी असूनही त्या विहीरीला पाणी होतं.
असे माझ्याकडे भरपूर किस्से आहेत विहिरींचे! अगदी भिवंडी मधेही १५-२० फुटांवर पाणी लागलंय (जिथे बोरवेल ७००-८०० फूट खोल जातात). हा नक्की काय प्रकार असतो? आपण आता त्यातल्या काही गोष्टींवर माहिती घेऊया.
विहीर आणि बोरवेल यात फरक काय? म्हणजे त्या स्त्रोताला पाणी मिळतं कुठून?
आपल्या सर्वांना जे गोड पाणी मिळतंय ते पावसाचं हे तर सगळ्यांना माहिती असेलच. हे पाणी जमिनीवर पडतं आणि काही जमिनीत मुरतं, काही जमिनीवरून उताराच्या दिशेने वाहून जातं.
जमिनीत मुरणारे पाणी मातीच्या विविध थरांतून खाली जातं, मुरूम आणि दगडाच्या अनेक थरांतून खाली जातं आणि शेवटी बरचसं पाणी तळाच्या कातळापर्यंत पोहोचतं. इथून, कातळाच्या काही ठिकाणी असलेल्या सूक्ष्म भेगांमधून जेमतेम १०-१२ टक्के पाणी अजून खाली जातं. असं पाणी शेकडो वर्षं मुरून जमा झालेलं असतं. बाकी पाणी कातळावर जमून विविध थरांमध्ये पसरतं, ज्याला आपण भूगर्भातील पाण्याची पातळी म्हणतो. ही विविध ठिकाणी भूगर्भ, माती, उतार, पाऊस वगैरे गोष्टींवर अवलंबून असल्याने वेगळी असू शकते.
आपण जेव्हा विहीर खणतो, तेव्हा या कातळापर्यंत पोहोचलो की त्या साठून राहिलेल्या पाण्याला बाहेर पडायला मार्ग मिळतो, ज्याला आपण विहिरीचा “झरा” म्हणतो.
बोरवेल करताना जोपर्यंत कातळ लागत नाही, तोपर्यंत केसिंग पाईप टाकतात. आणि कातळ लागल्यावर त्यात ड्रील करून खाली गेलेल्या १०-१२ टक्के पाण्याचा शोध घेतला जातो. यात, कातळावर असलेलं भूगर्भामधील पाणी आपल्याला मिळत नाही कारण केसिंग पाईपमधे ते येत नाही.
म्हणजे, बरेचदा असं होतं, की पाणी ३०-४० फुटांवर असतं आणि आपण बोरवेल स्वस्त आणि पटकन होते म्हणून २००-८०० फूट खोल जातो आणि शेकडो वर्षं मुरलेलं पाणी काढून वापरतो. जेवढं खोल जाऊ तेवढं पाणी आरोग्याच्या दृष्टीने घातक होण्याची खूप शक्यता असते.
बोरवेल ही फक्त एक शोषनलिका आहे आणि त्यात पाणी साठवून ठेवायची क्षमता नसते. त्यामुळे हा मर्यादित साठा कधीही संपू शकतो हे लक्षात घेऊन प्रत्येक बोरवेलचं योग्य पद्धतीने पुनर्भरण करणं आवश्यक असतं. त्याबद्दल नंतर लिहितो.
  
यावरून काय लक्षात ठेवायचं
१. जमिनीचा प्रकार, उतार, मातीच्या थराची जाडी, मातीचा प्रकार, भौगोलिक परिस्थिती, पाऊस आदि गोष्टींचा अभ्यास करून योग्य प्रकारे जलसंधारण उपाय केले तर निश्चीत फायदा होतो.
२. पाण्याचा स्त्रोत कसा आहे, कुठे आहे, त्याची ताकद किती आहे हे कोणाला नक्की सांगता येत नाही. त्याचा फ़क्त अंदाज बांधता येतो.
३. हे काम योग्य अधिकारी व्यक्तिकडून करून घेणं चांगलं, त्यामुळे यश मिळण्याचं प्रमाण खूप वाढतं.
४. विहीरीला पाणी मिळालं म्हणजे बोरवेल पण पाणी देईल हा समज चुकीचा आहे.
५. जमिनीला कुठेही भोक पडून पाणी मिळत नाही, तर पाणी आहे तिथे भोक पाडावं लागतं तर पाणी मिळतं.

विहिरीला किंवा बोरवेलला पाणी लागणं आणि ते वर्षभर पुरणारं असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यात आपल्याला काही कळत नाही, त्यामुळे योग्य व्यक्तीला विचारून त्याच्या सल्ल्याने काही करावं, हे सुद्धा बहुसंख्य लोकांना सांगायची तीव्र गरज निर्माण झाली आहे.  
डॉ. उमेश मुंडल्ये       

Monday 8 January 2018

वाघ्या - देवराई किती काळ आहे याचा दुवा!


लोक सहभागातून जीव विविधतेच संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताला परंपरेने एक सुदृढ आणि पुरातन वारसा दिला आहे. एखादी गोष्ट जर दीर्घकाळ यशस्वीपणे चालू ठेवायची असेल तर ती लोकांच्या जगण्याचा एक भाग झाली पाहिजे या गोष्टीची जाण आपल्या शहाण्या पूर्वजांना असावी. त्यांनी निसर्गातील अनेक घटक देव किंवा देवाचे प्रिय घटक मानून त्यांचं संरक्षण करण्याची प्रथा वेगवेगळ्या कारणांनी चालू केली. यात नद्या, तलाव, विविध डोंगर शिखरं, विविध वनस्पती आणि प्राणी, इत्यादि गोष्टींना धार्मिक महत्त्व देऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन पिढ्यानपिढ्या केलं. यातला एक आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे "देवराई". 
देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेलं असल्याने याची तोडकेली जात नाही. या जंगलातील सर्व गोष्टी धार्मिक भावनेने पिढ्यानपिढ्या सांभाळल्या जातात. हे देवाचे जंगल आहे त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतंही झाड तोडायचं नाही या ठाम भावनेने या देवरायांच संरक्षण केलं जातं. देवराईला कुंपण किंवा संरक्षक भिंत नसते, कोणी राखणदार नसतात, पण तरीही केवळ धार्मिक भावनेने या जंगलांच रक्षण केलं जातं. सामाजिक बंधन हा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा घटक आहे.
पण ही देवराई तिथे किती काळापासून असावी याबद्दल कोणी नक्की काही सांगू शकत नाही. तिथल्या वृक्षांच्या वयावरून याबद्दल केवळ एक अंदाज बांधता येतो.
पण, यात एक आशादायक चित्र सह्याद्रीमध्ये फिरताना हरिश्चंद्र गडाच्या परिसरात समोर आलं. या आहेत वाघ्याच्या देवराया! एका दगडावर वाघाचं चित्र कोरलेलं आहे आणि त्याची पूजा होते आहे अशी स्थानं. आदिवासींमध्ये अशी पद्धत आहे, की प्रत्येक पिढीचा एक वाघ्याचा दगड बसवला जातो. नवीन पिढी, नवीन दगड. साधारणपणे, ३० वर्षांच्या अंतराने नवीन दगड बसवला जातो. म्हणजे, एका पिढीचं अंतर ३० वर्षं धरलं जातं.
आता, यावरून आपण तो वाघ्याचा दगड ज्या देवराईमध्ये आहे त्या देवराईचा किमान कालावधी तरी नक्की सांगू शकतो. या भटकंतीमध्ये मी एका ठिकाणी वाघ्याचे १७ दगड बसवलेले पहिले.
याचा अर्थ, ती देवराई त्या आदिवासी समाजाकडून गेली ५०० वर्षं तरी जपली जाते आहे असं गणित आपण मांडू शकतो. (३० वर्षं x १७ दगड)
याचाच अर्थ असा होतो की, आदिवासी भागांमध्ये निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडं, इत्यादि गोष्टींना देव मानून जपायची परंपरा या भागात किमान ५०० वर्ष तरी आहे याची ही नोंद आहे.
अशा गोष्टी बघायला आणि अभ्यासायला मिळाल्या की आपल्या पूर्वजांच्या शहाणपणावर असलेला विश्वास आणखी वृद्धिंगत होतो. 

Friday 5 January 2018



कोकणात मातीचे बंधारे - इच्छा आणि वास्तव


जलसंधारण करताना पाण्याच्या स्त्रोतामध्ये बंधारे घालून पाणी अडवणं आणि स्त्रोताचं खोलीकरण करणं (गाळ काढणं) हे सर्वात लोकप्रिय उपाय आहेत.
सरसकट मातीचे बंधारे बांधावेत का? की यात काही नुकसानही होऊ शकतं? कोकणात मातीचे बंधारे किती उपयोगी? त्याचे तोटे काय? त्यात धोका काय? असे अनेक प्रश्न मनांत येतात. या लेखात त्याबद्दल संक्षिप्त माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे.
मातीचे बंधारे, माती किंवा रेती प्लास्टीकच्या पोत्यांमधे भरून बांधलेले बंधारे, हा उपाय कमी खर्चात होतो, त्याला विशेष कौशल्य लागत नाही, स्थानिक पातळीवर लागणारा माल आणि मनुष्यबळ उपलब्ध असतं, इत्यादि कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर सरसकट केला जातो. 
जिथे माती काळी आहे, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे, जिथे पाण्याचा प्रवाह वेगवान नाहीये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे खेकडे नाहीत, अशा ठिकाणी मातीचे बंधारे किंवा माती/रेती भरून प्लास्टीकच्या पोत्यांचे बंधारे यशस्वी ठरतात.
जिथे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे, माती पाण्याबरोबर सहज वाहून जाते, पाण्याचा प्रवाह वेगवान आहे, उतार भरपूर आहे आणि खेकडे आहेत, अशा ठिकाणी मातीचे बंधारे किंवा माती/रेती भरून प्लास्टीकच्या पोत्यांचे बंधारे नुकसानकारक असतात.
नक्की काय होतं? -
१ जिथे पाण्याचा प्रवाह वेगवान असतो, तिथे या बंघाऱ्यावर साठलेल्या पाण्याचा दबाव येतो आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने, माती हळूहळू पाण्याबरोबर वाहून जायला सुरूवात होते आणि काही काळानंतर बंधारा निरूपयोगी होतो.
२ कोकणात बहुतेक सर्व ठिकाणी पाण्याच्या स्त्रोतामधे आणि आजुबाजुला खेकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. आपण जेव्हा बंधारा बांधतो आणि पाणी साठवतो, तेव्हा खेकडे तिथे सुरक्षित वातावरणामुळे येतात. ते मातीत बिळं करून राहतात. त्यामुळे पाण्याला जायला विविध ठिकाणी मार्ग उपलब्ध होतो. काही वेळा बंधाऱ्यातच बिळं होतात आणि पाणी वाहून जातं आणि सगळी मेहनत आणि पाणी वाया जातं.
३ जिथे प्लास्टीकच्या पोत्यांचा बंधारा बांधला जातो, तिथे अगदी चुकून जरी खेकड्याची नांगी लागून, वाहून येणाऱ्या काटक्या, फांद्या लागून पोतं फुटतं आणि आतली माती/रेती पाण्याबरोबर वाहून जाते.
४ मातीचा/पोत्यांचा बंधारा एका ठराविक उंचीचाच बांधावा लागतो. त्यामुळे पाण्याचा साठा मर्यादित करावा लागतो. आणि बाष्पीभवन होऊन बरचसं पाणी उडून जातं आणि जेव्हा गरज असते, तेव्हा उन्हाळ्यात हा बंधारा कोरडा पडतो.
कोकणात ह्या अडचणी विशेष जाणवतात. पण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या पाहून इतर ठिकाणी चाललेले उपाय सरसकट कोकणात केले जातात. यासाठी कोणी तज्ज्ञ व्यक्तीला विचारून त्याचं मत गांभीर्याने घ्यावं असं फार कमी लोकांना वाटतं.
या सर्व कारणांमुळे होणारं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं नुकसान फारसं कोणीच विचारात घेताना दिसत नाही. या बंधाऱ्यांसाठी लागणारी माती ही त्याच परिसरातून घेतली जाते. ती माती दरवर्षी पावसात वाहून जाते. त्यामुळे पुढचा बंधारे गाळाने भरतातंच, पण दरवर्षी आपण त्या परिसरातील माती कायमस्वरूपी गमावून बसतो. माती गमावली की त्याचा दुष्परिणाम शेती आणि जंगलांवर होतो आणि त्या परिसराची वाटचाल वाळवंट होण्याकडे होते.
एकीकडे जंगलतोड जोरात होते आहे, शेती कमी होत आहे त्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होत चालली आहे, आणि दुसरीकडे, आहे ती माती अशा केवळ प्रासंगिक सोयीच्या गैरसमजुतीमुळे आपण कायमस्वरूपी गमावत आहोत. अशी शेकडो ट्रॅक्टर माती दरवर्षी असे बंधारे बांधत असलेल्या प्रत्येक गावात दरवर्षी वाहून जाते आणि आपण ती कायमस्वरूपी गमावतो आहोत. 
या सर्व बाबींचा योग्य अभ्यास केला तर लक्षात येईल की मातीचे बंधारे (विशेषत: कोकणात) हा उपाय पाणी साठवण्यासाठी सोपा म्हणून होत असला, तरी त्यामुळे होणारं नुकसान हे खूपच भयंकर आणि कायमस्वरूपी आहे. ही माती परत आणता येत नाही आणि माती परत तयार होणं ही अनेक दशकं लागणारी गोष्ट आहे.
या सर्व कारणांमुळे, जे जलसंधारण, व्यवस्थापन आदि कामं करू इच्छितात, त्या सर्वांना नम्र आणि कळकळीचं आवाहन आहे की स्थलानुरूप काम करा, वर सांगितल्याप्रमाणे परिस्थिती असेल तर तिथे मातीचे बंधारे बांधून पाणी, माती, शेती आणि जंगल धोक्यात आणू नका. ते पर्यावरण आणि जीवसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.

Friday 13 October 2017

विहीगाव जल संधारण प्रकल्प - दुसऱ्या पावसाळ्यानंतर

विहीगाव बंधारा (अशोक धबधबा)
दोन वर्षांपूर्वी विहीगाव मध्ये विवेकानंद सेवा मंडळ या संस्थेसाठी जल संधारण प्रकल्प सुचवण्यासाठी, तयार करण्यासाठी आणि प्रत्यक्ष कामासाठी काम केलं होतं. आज त्याच्या पुढच्या कामासाठी गावात सर्वेक्षणासाठी गेलो असताना या बंधाऱ्याला भेट दिली. वर आहे तो त्याचाच फोटो. अशोका चित्रपटात दाखवलेला हाच तो धबधबा. एवढं पाणी असूनही गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई व्हायची. त्यावर उपाय म्हणून जी उपाययोजना केली गेली त्यातील एक भाग म्हणजे या बंधाऱ्याची दुरुस्ती आणि बळकटीकरण.

बाजूच्या फोटोत दिसतेय ती दोन वर्षांपूर्वीची अवस्था. गाळाने पूर्ण भरून गेलेला आणि भेगाळलेला बंधारा. सर्व बंधाऱ्यातून पाणी नीट पाझरून जायचं. याचं बळकटीकरण आणि दुरुस्ती करणं हा उपाययोजनेचा एक भाग होता.








बाजूच्या फोटोत आहे तो दुरुस्ती केल्यानंतर दोन वर्षांनी आज काढलेला फोटो. आज या बंधाऱ्यामध्ये जवळजवळ १,२०,००,००० लिटर पाणी आहे. साधारण ३०० मीटर पर्यंत हा पाणीसाठा विस्तारलेला आहे. या बंधाऱ्यातून काही पाणी अजूनही झिरपताना दिसतंय पण ते बंद करण्याची प्रक्रिया ठरली आहे. त्यामुळे ते बंद होईल. हा आणि याच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला असलेला एक बंधारा, हे दोन्ही मिळून आज गावात
साधारण दोन कोटी लिटर पाणी उपलब्ध आहे.

मात्र, हे पाणी फक्त साठणं हे काही या प्रकल्पाचं उद्दिष्ट नव्हतं आणि नाही. ही पहिली पायरी आहे. या पाण्याचा वापर करून गावातील तरुण शेतीतून जेव्हा पैसे मिळवतील तेव्हा हा प्रकल्प यशाकडे वाटचाल करतोय असं म्हणता येईल.
या कामासाठी भारत विकास परिषद, अनेक सुहृद आणि मित्रमंडळी यांचा मोलाचा सहभाग आणि आर्थिक मदत मिळाली म्हणून विवेकानंद सेवा मंडळ हा प्रकल्प वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण करू शकलं. आता जबाबदारी कार्यकर्ते आणि गावकरी तरुणांची आहे. सुरुवात तर झालीय, बघूया या वर्षी आणखी काय आनंद मिळतोय ते!

आत्ता शेअर केलीय ती एक आनंददायक आठवण! कामाच्या सफलतेची!
डॉ उमेश मुंडल्ये




Saturday 13 May 2017

कोकणात जलसंधारण करताना घ्यायची काळजी 

कोकणात जलसंधारण करताना घ्यायची काळजी 

१. मुख्य नदीवर काम करण्याआधी उपनद्या, ओढे, झरे, इत्यादि स्त्रोतांवर काम करावं. 

२. गाळ काढण्याआधी, प्रवाहाच्या वरच्या भागात Gabion बंधारे (किमान २) बांधावेत. त्यामुळे पावसात लगेच परत गाळ येणार नाही. 

३. गाळ काढताना, स्रोताचा नैसर्गिक उतार कायम ठेवावा. त्यांत फेरफार करू नये. 

४. पाण्याच्या स्रोतावर काम करताना त्याच्या दोन्ही बाजूंचा उतार ४५ अंशांत ठेवावा. त्याने स्थिरता येते आणि बाजू ढासळून पडत नाहीत. 

५. कामाचं स्वरुप ठरवताना, आधी आजूबाजूचे उतार, भौगोलिक परिस्थिती, पाण्याच्या प्रवाहाचा वेग इत्यादि बाबींचा अभ्यास करून मगच गाळ किती काढायचा याबद्दल निर्णय घ्यावा. योग्य अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. 

६. शक्य होईल तेवढं स्थानिक सामान वापरावं. 

७. जर बंधारा बांधायचा निर्णय घेत असाल तर "समृद्ध कोकण" च्या त्या विषयातील अधिकारी व्यक्तीकडून आराखडा तयार करून घ्यावा. 

८. बंधाऱ्यांत गाळ साठू नये यासाठी त्यात पाइप (वेंट) ठेवावेत. 

९. आंधळेपणाने कोणाचीही नक्कल करू नये. तसं केल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. अनेकदा, तो पाण्याचा स्त्रोत उध्वस्त होऊन कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्यावी.  

जलसंधारणाच्या यशस्वी कामासाठी मनापासून शुभेच्छा!

डॉ उमेश मुंडल्ये.  

9967054460

drumundlye@gmail.com